सोनपेठ( परभणी ) : तालुक्यातील कोठाळा या गावाजवळ आज सकाळी आठच्या सुमारास अज्ञात सात ते आठ जणांनी सोनपेठ-गंगाखेड बसवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी मधूकर कुकडे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सोनपेठ येथे मुक्कामी असलेली बस क्र. एम.एच. 06 एस. 8576 ही सकाळी सात वाजता गंगाखेडला जाण्यासाठी निघाली. आठच्या वाजेच्या सुमारास सदर बस नरवाडीच्या पुढे कोठाळा पाटीजवळ आली असता त्याठिकाणी रस्ता दगडे लावून अडविण्यात आला होता. चालकाने तेथे बस थांबवली. बस थांबताच चार मुले बसच्या समोर येऊन उभे राहिले. लागलीच शेजारील शेतामधुन काही युवक बससमोर आले व मराठा आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देऊ लागले.
प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने गाडीतील प्रवाशांना खाली उतरवले. यानंतर युवकांनी गाडीवर दगडफेककरून गाडीच्या काचा फोडल्या. यामध्ये बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार संतोष मुपडे करत आहेत.