लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर येथील मोंढा बाजारपेठेत बैलांच्या विविध साजांनी दुकाने सजली असली तरी सजावटींच्या या वस्तूंना जीएसटी लागू झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत वाढीव किंमतीने साज विक्री होत आहे. परिणामी खिश्याला कात्री लावत बळीराजाला पोळ्याचा सण साजरा करावा लागत आहे.येथील नवा मोंढा बाजारपेठेत कृषीक्षेत्राशी संबंधित साहित्यांची विक्री करण्याची दुकाने आहेत. ८ ते १० दुकानांमधून कृषी साहित्य विक्री केले जात आहे. ९ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात पोळ्याचा सण साजरा केला जात आहे. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा रुढ आहे. त्यामुळे बैलांना सजविण्यासाठी विविध सजावटीचे साहित्यही बाजरपेठत उपलब्ध झाले आहे. शनिवारी हे साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.यावर्षी बैल सजावटीच्या साहित्यांनाही वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने या साहित्याच्या किंमती गतवर्षीच्या तुलनेत वाढल्या. परिणामी अधिकचे पैसे मोजून काहीसे महागानेच हे साहित्य खरेदी करावे लागले. महागाईचा फटका ग्राहकीला बसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. दरम्यान, बैलांसाठी लागणाºया घागरमाळ, आकर्षक झूल, गोंडे, मोरकी, बाशिंग, बैलांचे पैंजण, घंटी, गाठले, कवडी माळ आदी सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली आहेत. शनिवारी सकाळपासूनच या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे पहायवास मिळाले.दुसरीकडे गांधी पार्क, गुजरी बाजार येथे पोळ्यानिमित्त लघू व्यावसायिकांनी स्टॉल्स लावले होते. यावर्षी प्लास्टर आॅफ पॅरीसपासून तयार केलेले बैल बाजारात विक्रीसाठी आले आहेत. ८० रुपयांपासून ७५० रुपयांपर्यंत या बैलांची विक्री झाली. तसेच पोळ्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य, भाजीपाला, केळीच्या पानांची शनिवारी मोठी विक्री झाली.बाहुबली हाराला मागणीबैलांच्या सजावटीसाठी यंदा प्रथमच बाहुबली हार बाजारपेठेत दाखल झाला आहे. विशेषत: पोळ्याच्या दिवशी बैलांना कवडी हार घातला जातो. त्यात आता बाहुबली हाराची भर पडली आहे. शेतकºयांकडून या हाराला मागणी वाढली असून, ५०० रुपयांना एक या दराने हाराची विक्री होत आहे. याशिवाय केसाळ हाराचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे विक्रेते प्रभाकर रेवणवार यांनी सांगितले.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सजावटीच्या साहित्याचे दर वाढले आहेत. या साहित्यांना जी.एस.टी. लागू झाली असून, त्याचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. पंधरा दिवसांपासून बाजारपेठेत हे साहित्य उपलब्ध झाले असले तरी शनिवारीच ग्राहकांची संख्या बºयापैकी वाढली होती.-प्रभाकर रेवणवार, व्यावसायिक
परभणीची बाजारपेठ : बैलांचे साजही जीएसटीच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:35 AM