परभणी : राज्यभरात सध्या टोमॅटोच्या गडगडलेल्या दराचा प्रश्न गाजत असून, जिल्ह्यातील सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीला उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादकांसमोरील चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी या दोन हंगामात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच काही शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीतून वेगळा मार्ग स्वीकारला आहे. कमी काळात पैसा मोकळा होत असल्याने अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले. मात्र या शेतकऱ्यांनाही बाजारभावाचा फटका सहन करावा लागत आहे. निसर्गाने साथ दिली; परंतु, परिस्थिती साथ देत नसल्याचीच भावना या शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
राज्यभरात सध्या टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. टोमॅटोला सध्या मिळत असलेल्या भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत टोमॅटोचे पीक घेतले जाते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत टोमॅटो उत्पादनाचे प्रमाण कमी असले तरी, सुमारे पाच हजार शेतकरी टोमॅटो उत्पादन करतात. चांगला भाव मिळाल्यास मुंबई. औरंगाबाद यांसारख्या बाजारपेेठेत टोमॅटोची निर्यात होते. मात्र सध्या कोणत्याच बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने स्थानिक बाजारपेठेतच टोमॅटोची विक्री होत आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत अडीच ते तीन रुपये किलो असा टोमॅटोला भाव मिळत आहे. त्यामुळे चांगले उत्पादन झाल्यानंतरही या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
निर्यात बंद असल्याचा फटका
परदेशात होणारी टोमॅटोची निर्यात बंद आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर होत आहे. निर्यात बंद असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढली. परिणामी भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो निर्यातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. शिवाय टोमॅटो पिकाला हमीभाव जाहीर करावा, अशीही मागणी पुढे येत आहे.
एकरी पावणेदोन लाखाचा खर्च
टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी सरासरी एका एकराला काढणी आणि काढणीपश्चात असा सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च येतो. रोप लागवड, खत, फवारणी, बांधणी आणि मल्चिंग असा सुमारे १ लाख रुपयांचा खर्च येतो, तर तोडणी आणि वाहतूक खर्च ७५ हजारांपर्यंत जातो. एका एकरात साधारणत: ६० टन टोमॅटोचे उत्पादन होते. अडीच ते तीन रुपये किलो सध्या टोमॅटोला भाव मिळत असून, एकरातून कसेबसे एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडतात. त्यामुळे उत्पादन खर्चातही ७५ हजारांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
टोमॅटो हे नाशवंत पीक आहे. ते बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर किमान १० रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे. दोन आणि तीन रुपयांचा भाव मिळत असेल, तर नुकसान होणारच.
- विलास बाबर, शेतकरी