शहरातील बसस्थानक परिसर, डाँक्टर लेन, स्टेशन रोड, गुजरी बाजार, कच्छी बाजार, जनता मार्केट, गांधी पार्क, अपना काँर्नर, ग्रँन्ड काँर्नर, जिंतूर राष्ट्रीय महामार्ग तसेच वसमत महामार्ग, गंगाखेड रोड, शनिवार बाजार, नानल पेठ, शिवाजी चौक, सरकारी दवाखाना या परिसरात अनेकांनी छोटे-मोठे अतिक्रमण केले आहेत. या सर्व भागात व्यापारी प्रतिष्टाने, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यलये, दवाखाने अशी महत्वाची ठिकाणे आहेत. मुख्य बाजारात दररोजच नागरिकांची गर्दी असते. यातच बाजारपेठेत वाहनतळ, हाँकर्स झोन उपलब्ध नसल्याने वाहतूकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. यामध्ये रस्त्यावर थाटलेली दूकाने, लहान रस्ते आणि त्यातच नालीवर केलेले बांधकाम याचा अडथळा बाजारपेठेत होत आहे. मात्र, याकडे मनपा प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. शहरातील कच्चे व पक्के दोन्ही अतिक्रमणे काढून टाकावीत, अशी मागणी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांतून होत आहे.
फोटोपुरती होते कारवाई
मनपा प्रशासन २-३ वर्ष झाले की कधीतरी धडक कारवाई महीमो राबविते. ती कारवाई ४-५ दिवसांत दररोज अस्थायी अतिक्रमणे काढून कारवाई केल्याचा आव आणला जातो. केवळ फोटोपुरते आणि नावापुरते काम केले की पुन्हा अनेक वर्ष आपल्या प्रभागात अतिक्रमण नाहीतच, अशा अर्विभावात अधिकारी, कर्मचारी राहतात. मात्र, याचा त्रास नागरिकांना दररोज सहन करावा लागत आहे.
डाँक्टर लेनला पायी चालणे कठीण
शहरातील डाँक्टर लेन, सिटी क्लबची मागील भिंत या परिसरात व डिग्गी नाला येथे बिनधास्तपणे अतिक्रमणे झाली आहेत. हाँटेल, टपरी, रस्त्यावरील मोबाईल दुकाने, हरमाल साहित्य यांची दुकाने येथे थाटली आहेत. बसस्टँन्ड ते गव्हाणे चोक या रस्त्यावर थांबणारी खासगी वाहने, ऑटो, काळी पिवळी यांच्यामुळे तर पायी चालणेही कठीण जात आहे.
प्रभाग समिती, स्वच्छता विभाग झोपेत
शहराचे विभाजन तीन प्रभाग समितीत केले आहे. यातील प्रभाग समिती क मध्ये मागील तीन महिन्यापूर्वी वसमत रस्त्यावरील काळी कमान ते उघडा महादेव मंदिर या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली होती. मात्र, अशी मोहिम प्रभाग समिती अ, ब यांच्यावतीने त्यांच्याच कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुख्य बाजारपेठेच्या भागात राबविण्यात आली नाही.
एस.पी.सिंग यांच्या कारवाईची आठवण
तत्कालिन जिल्हाधिकारी एस.पी.सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत शहर अतिक्रमणमुकत केले होते. तसेच तत्कालिन मनपा आयुक्त अभय महाजन, राहूल रेखावार यांनी सुध्दा बरेच प्रयत्न केले होते. मात्र, यानंतर पुन्हा मनपाच्या दुर्लक्षामुळे शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.
या उपाययोजना कराव्यात
वाहनतळाचा प्रश्न सोडवावा
हाँकर्स झोन निश्चित करावेत
फिरत्या हातगाड्यांना एकाच ठिकाणी जागा द्यावी
कायमस्वरुपी अतिक्रमण हटाव पथक कर्यरत ठेवावे
सम-विषम पार्किंग करावी.
पक्के अतिक्रमण पुर्वीप्रमाणे जमीनदोस्त करावेत.