परभणी : जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून, त्यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वच ठिकाणी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. मात्र शहराच्या प्रमुख रस्त्यांवर दिवसभर नागरिकांची वर्दळ पहावयास मिळाली. त्यामुळे केवळ बाजारपेठेसाठीच संचारबंदी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यास अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १३ व १४ मार्च असे दोन दिवस संचारबंदी लागू केली आहे. १२ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून लागू केलेल्या या संचारबंदीचा अंमल १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. शनिवारी सकाळपासूनच जिल्हाभरात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठेसह गल्ली-बोळातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. तसेच प्रमुख भागात पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावला होता. येथील कच्छी बाजार, गुजरी बाजार, शिवाजी चौक, स्टेशनरोड या भागातील सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात आली. दिवसभरात एकही दुकान उघडण्यात आले नाही. त्यामुळे अनेक दिवसांनंतर प्रथमच बाजारपेठ परिसरात शुकशुकाट पहावयास मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र शहरातील प्रमुख रस्त्यांसह कमी वर्दळीच्या रस्त्यांवरही शनिवारी वाहनांची वर्दळ सुरूच होती. कोणतेही काम नसताना काहीजण वाहने घेऊन घराबाहेर पडल्याचे दिसून आले. या नागरिकांची कुठेही तपासणी झाली नाही. त्यामुळे दिवसभर रस्त्यांवर वाहतूक सुरूच होती.
मानवतमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मानवत शहर आणि परिसरात संचारबंदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे, स्वच्छता निरीक्षक ओम चव्हाण, सुभाष लांडगे, लेखापाल सुशील खोडवे, सचिन सोनवणे यांनी शहरात फिरून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. शहरातील बाजारपेठ परिसरातील दुकाने कडकडीत बंद राहिली.
परभणी आगारातील बससेवा ठप्प
एस. टी. महामंडळाच्या परभणी आगारानेही बसफेऱ्या बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्रतिसाद दिला. परभणी आगारातून लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यांतर्गत अशा एकूण ३१८ फेऱ्या दररोज केल्या जातात. शनिवारी मात्र या आगारातून एकही बस धावली नाही. त्यामुळे महामंडळाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ऐन वेळी प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची काही काळ गैरसोय झाली होती. मात्र जिल्ह्याबाहेरील आगारातून बसफेऱ्या सुरूच असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र या बसगाड्यांना मोठी गर्दी झाली होती. परभणी आगाराच्या बसेस बंद असल्याने बाहेरील आगाराच्या बसेस मात्र फुल्ल होऊन धावल्या.