परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे बाजारपेठांवर लादलेले निर्बंध आता पूर्णत: सैल झाले असून, बाजारपेठेतील सर्व दुकानांसह हॉटेल व्यवसायही रात्री १०वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शनिवारी एका आदेशान्वये दिली आहे. या आदेशामुळे व्यापाऱ्यांची मागील काही महिन्यांपासून होत असलेली गैरसोय दूर होणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात बाजारपेठांवर निर्बंध लादले होते. त्यामुळे चार महिन्यांपासून जिल्ह्यातील बाजारपेठा या निर्बंधांचे पालन करीत सुरू ठेवल्या जात होत्या. या काळात व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. जिल्ह्यात आता कोरोना संसर्ग कमी झाला असून, टप्प्याने निर्बंध सैल करण्यात आले आहेत. ३ ऑगस्ट रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच रविवारी अत्यावश्यक नसलेली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश होते.
या आदेशात सुधारणा करीत १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी नवीन आदेश काढत सर्व दुकाने सर्व दिवसांसाठी रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. विशेष म्हणजे यात हॉटेल व्यवसायाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून हॉटेल व्यावसायिकांची होत असलेली कुचंबणा दूर झाली आहे. सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, मॉल्स,जिम, योगा सेंटर देखील सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशानुसार दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची मागील अनेक महिन्यांपासून होत असलेली कोंडी दूर झाली आहे.
उपहारगृहांसाठी ५० टक्क्यांची अट
उपहारगृह, हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली असली तरी काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यात आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेनेच उपाहारगृहे सुरू ठेवता येणार आहेत. उपहारगृहात प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत ग्राहकांना मास्क अनिवार्य राहील. याबाबत स्पष्ट सूचना लावणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण करून घ्यावे, ग्राहकांकडून जास्तीत जास्त ९ वाजेपर्यंत शेवटची मागणी घ्यावी. तसेच २४ तास पार्सल सेवा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
५० टक्क्यांच्या क्षमतेने विवाह सोहळे
खुल्या प्रांगणात अथवा मंगल कार्यालयातील आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविडच्या नियमांचे पालन करीत विवाह सोहळा पार पाडण्यासही या आदेशाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त २०० वऱ्हाडींची मर्यादा राहणार आहे.
सिनेमागृहे, धार्मिक स्थळे बंदच
जिल्ह्यातील इतर व्यवसायांना परवानगी मिळाली असली तरी सिनेमागृहे आणि धार्मिक स्थळे मात्र पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. सिनेमागृह, नाट्यगृह, धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे आंतरराज्य प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.