जिल्ह्यात वाढले सिंचनाचे क्षेत्र
परभणी : जिल्ह्यात यावर्षी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, सिंचन क्षेत्र वाढले आहे. येलदरी, निम्न दुधना या मुख्य प्रकल्पांबरोबरच ढालेगाव, डिग्रस, मुदगल, तारुगव्हाण या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झालेला आहे. त्याचप्रमाणे जायकवाडी प्रकल्पातूनही जिल्ह्याला पाण्याचे एक आवर्तन मिळाले आहे. परिणामी, रबी आणि बागायती पिकांसाठी पाणी उपलब्ध झाले असून, जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढले आहे.
रोहयोच्या कामांची संख्या वाढेना
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढविण्यात आली नाहीत. त्यामुळे साधारणत: एक लाखांपेक्षा अधिक मजुरांची जिल्ह्यात नोंदणी असताना काम मात्र अवघ्या ८ ते १० हजार मजुरांनाच मिळत आहे. विशेष म्हणजे शासकीय यंत्रणाच कामे हाती घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. लॉकडाऊन काळात मोठ्या शहरातून अनेक जण जिल्ह्यात वास्तव्याला आले आहेत. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी रोहयोची कामे वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.