कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन झाल्यानंतर कल्याण, मुंबई नामक मटका जुगार बंद होता. तसेच तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे हे जून महिन्यात सेवानिवृत्त झाल्याने सेलूचा पदभार जिंतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर मटका, जुगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र काही दिवसापासून मटका किंग यांनी नवीन शक्कल लढवत मोबाईल फोनवरून कल्याण, मुंबई नामक मटका जुगार घेतला जात आहे. शहरातील १५ ते २० एजन्ट घरात बसून तर काही जण फिरून मटका घेत आहेत. कामगार वस्तीत चिठ्ठी दिल्या जात आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन, मोंढा, उपजिल्हा रुग्णालयात परिसर, वालूर नाका, शिवाजी नगर, गायत्री नगर, गणपती गल्लीसह तालुक्यातील मोरेगाव, आहेर बोरगाव, देऊळगाव, येथे मटका घेतला जात आहे. शहरातील एक बुकी आणि वालूर येथील एक अशा दोन बुकी चालक हा व्यवसाय घेत आहेत. कल्याण, मुंबई मटका जुगारामुळे कामगार आणि तरूण वर्ग मोठया प्रमाणावर आहारी जात आहेत. परिणामी मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून वाद विवाद वाढत आहेत. दरम्यान, मोबाईल वर मटका जुगार जोरात असून दररोज लाखोंची उलाढाल होत असून बुकी चालक मालामाल होत आहेत.
सेलूत मोबाईलवरून मटका जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:14 AM