लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील विविध औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिली जात आहेत. हा प्रकार नियम डावलणारा असला तरी कारवाई होत नसल्याने तो सर्रास सुरू आहे.
कोणत्याही आजारावरील औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांचे प्रिस्क्रिप्शन पाहूनच देणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक औषधी दुकानांवर डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही औषधी दिली जात असल्याचे बुधवारी केलेल्या पाहणीत आढळले. अन्न व औषध प्रशासनाचे औषधी दुकानांवर नियंत्रण असते. मात्र, जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून फारशा कारवाया होत नसल्याने हा प्रकार बळावला असून, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय काही औधषी बिनधास्तपणे दिली जात आहे. याविरुद्ध कारवाई होणे आवश्यक झाले आहे.
कोरोकाळात सर्दी-अंगदुखीसाठी डॉक्टरकडे कोण जाणार?
कोरोनाच्या संसर्ग काळात आणि काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तापाची साथ पसरल्यानंतर हा प्रकार वाढल्याचे दिसून आले.
सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या छोट्या-मोठ्या दुखण्यावर नागरिक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी औषधी दुकान गाठतात.
औषधी दुकानांतूनही दुखणे सांगितल्यास लगेच त्यावर औषधी दिली जाते.
मोजक्याच कारवाया
औषध प्रशासनाकडून वर्षातून एक ते दोन वेळाच औषधी दुकानांची तपासणी केली जाते. या विभागात मनुष्यबळ कमी असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामुळे कारवायांची संख्याही कमी असल्याची माहिती मिळाली.
अनेक ठिकाणी मिळतात चिठ्ठीशिवाय औषधी
नानलपेठ परिसर
शहरातील नानलपेठ भागातील काही औषधी दुकानांची पाहणी केली असता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याचे दिसून आले. औषधी दुकानावर ठराविक दुखणे सांगितल्यास त्यावर लगेच टॅबलेट दिल्या जात असल्याचे दिसून आले. गंभीर आजारासाठी मात्र डॉक्टरांची चिठ्ठीच मागितली जाते.
वसमत रोड
येथील वसमत रोड भागातील काही औषधी दुकानांत अशाच पद्धतीने औषधींची मागणी केली असता नकार मिळाला नाही. ताप, सर्दी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारावर थेट औषधी दुकानातूच औषधी दिली जात असल्याचे दिसून आले. या भागातही गंभीर आजाराच्या औषधी मात्र चिठ्ठीशिवाय मिळाल्या नाहीत.
शहरातील काही औषधी दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी मिळत असल्याने यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात जिल्ह्यात किती कारवाया केल्या याची माहिती मिळू शकली नाही.