लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राजकीय पक्षांकडून युवकांचा केवळ वापर करून घेतला जात आहे़ त्यामुळे युवकांनी हे ओळखले पाहिजे़ महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी युवकांनी मनसेत दाखल व्हावे़ योग्य कार्यकर्त्याची दृष्टी पाहून त्याला निश्चित संधी दिली जाईल, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले़परभणी शहरातील बी़ रघुनाथ सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरे बोलत होते़ यावेळी मनसेचे अभिजीत पानसे, राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, अशोक तावडे आदींची व्यासपीठावर उपस्थित होती. राज ठाकरे म्हणाले, राज्यातील परिस्थिती बिकट आहे़ युवकांचा केवळ वापर करून घेतला जात आहे़ या युवकांना योग्य दिशा देण्यासाठी मनसे प्रयत्न करणार आहे़ ज्यांना या क्षेत्रात काम करण्याची तडफ आहे़ त्यांनी मनसेत दाखल व्हावे, कार्यकर्त्यांची वज्रमूठ बनवून समाजकारण करण्यासाठी मनसेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत़, असे ते म्हणाले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, शेख राज, गणेश सुरवसे, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.सेलूत शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटनसेलू- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते २३ जुलै रोजी शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले़ दरम्यान, राज ठाकरे यांनी संवाद न साधल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला़ विद्यानगर येथील जनता सेवा केंद्रातील गणेश भिसे यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या शेतकरी मदत केंद्राचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले़ यावेळी शेख राज, गणेश भिसे, निजलिंगआप्पा तरवडगे, गणेश निवळकर, गुलाबराव रोडगे, गणेशराव बोराडे, शंकर लिंगायत, राजाभाऊ मोगल आदींची उपस्थिती होती़ मनसेने पर्यावरण बचाव मोहिमेंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी १ लाख सिडबॉम्ब पेरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ या उपक्रमाची माहितीही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतली़ त्यानंतर रायगड कॉर्नर येथे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी आयोजित केलेला फराळ वाटप कार्यक्रम ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला़ यावेळी युवक मोठ्या संख्येने जमा झाले होते़ मात्र राज ठाकरे यांनी स्वागत स्वीकारून प्रातिनिधीक स्वरुपात फराळ वाटप करून युवकांशी संवाद न साधताच परभणीच्या दिशेने रवाना झाले़ त्यामुळे उपस्थितांचा हिरमोड झाला़
परभणी येथे कार्यकर्ता मेळावा : मनसे युवकांना योग्य न्याय देईल- राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:49 AM