वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प आणि वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये २ जुलै रोजी कृषी शिक्षण व संशोधन या विषयावर सामंजस्य करार झाला. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. अशोक ढवण, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय सहयोग विभागाचे उपाध्यक्ष डॉ.आसिफ चौधरी, सेंटर फोर प्रिसिजन अंड ऑटोमेटेड अग्रीकल्चरचे संचालकडॉ. किन झग, अधिष्ठाता डॉ. रिचर्ड झग, नवी दिल्ली येथील नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अग्रवाल, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक गोपाळ शिंदे, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मनोज कारकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय सहयोग विभागाचे उपाध्यक्ष आसिफ चौधरी म्हणाले, जागतिक स्तरावर वॉशिंग्टन स्टेट यूनिवर्सिटी ही संस्था नावाजलेली असून कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकूणच जागतिक स्तरावरील कृषी उत्पादकता वाढू शकते. त्यामुळे या सामंजस्य करारास मानवतेच्या दृष्टीने महत्त्व आहे. मागील पाच वर्षात अमेरिकेसह संपूर्ण जग वेगवेगळ्या आव्हानांवर काम करत आहे. त्यात बदलत्या परिस्थितीत कृषी शिक्षण व संशोधन यांच्या समोरही आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, जगातील अग्रगण्य वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीशी परभणी कृषी विद्यापीठाने केलेल्या करारामुळे आधुनिक डिजिटल शेती तंत्रज्ञानाबाबत विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांच्या कौशल्य विकासात भर पडणार आहे. त्याचा फायदा मराठवाडा तसेच देशातील कृषी क्षेत्राला होईल. तसेच विद्यापीठाच्या संशोधनाला जागतिक पातळीवर चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात प्रमुख अन्वेषक डॉ.गोपाळ शिंदे यांनी विद्यापीठातील नाहेप प्रकल्पातील विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. विना भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ.राजेश कदम, भगवान असेवार, प्रा.संजय पवार, डॉ.मेघा जगताप, डॉ. कैलास डाखोरे, रविकुमार कल्लोजी, खेमचंद कापगते, डॉ. नरेंद्र खत्री, डॉ.अविनाश काकडे, डॉ.अनिकेत वाईकर, हेमंत रोकडे, सचिन कराड, शिवराज शिंदे, रहिम खान, शिवानंद शिवपुजे, संजीवनी कनवटे आदी या प्रसंगी उपस्थित होते.