यावर्षीच्या हिवाळ्यात वातावरणात चांगलाच गारठा निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मागील दोन आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली होती. दिवसभर कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी उकाडा अशा परिस्थितीचा नागरिकांनी सामना केला. हिवाळ्यातही उन्हाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चार दिवसांपासून परत वातावरणात बदल झाला असून, तापमानात मोठी घट झाली आहे. दररोज दोन ते तीन अंशाची घट किमान तापमानात होत आहे. रविवारी किमान पारा ८.५ अंशावर स्थिरावला, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने दिली. त्यामुळे पहाटेपासूनच हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. सायंकाळच्या सुमारासही वातावरणात चांगलाच गारवा होता. थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सायंकाळी उशिरानंतर शहरातील वाहतूक विरळ होत आहे.
अशी झाली किमान तापमानात घट
१ डिसेंबर : १५ अंश
२ डिसेंबर : ११.५ अंश
३ डिसेंबर : १०.५ अंश
४ डिसेंबर : ९.४ अंश
५ डिसेंबर : ८.८ अंश
६ डिसेंबर : ८.५ अंश