सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथे आश्रोबा भागवत यांच्या शेत आखाड्यावरील २५ कोंबड्यांचा मृत्यू १८ फेब्रुवारी रोजी झाला होता. मृत कोंबड्यांचे ५ नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. याबाबतचा अहवाल शुक्रवारी उशिरा पशुवैद्यकीय विभागाला प्राप्त झाला. त्यात या कोबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तिडी पिंपळगावसह परिसरातील एक किलोमीटरमधील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ए. बी. लोणे, सहाय्यक उपायुक्त डॉ. कल्याणपुरे,नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.प्राजक्ता कुलकर्णी, पशुधन अधिकारी डॉ.के.पी.भालेराव, पशुधन पर्यवेक्षक एस.जी. गाडीलोहार, सय्यद मोसीन, आर.पी. शिंदे, तलाठी सोडगीर यांच्या पथकांने एक कि.मी. परिसरातील ८९ कोंबड्या नष्ट केल्या. तर या १ कि.मी. परिसरात ३ महिने कोंबडी खरेदी - विक्रीसाठी प्रतिबंध केला आहे. तसेच नष्ट केलेल्या प्रतिकोंबडी ९० रुपये अनुदान पशुपालक यांना दिले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली. बर्ड फ्लूबाबत परिसरातील पशुपालकांना माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले.
तिडी पिंपळगावातील ८९ कोंबड्यांना दयामरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:33 AM