नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंड
परभणी : शहरातील बाजारपेठ भागासह बसस्थानक परिसरात नियम मोडत, वाहतुकीला अडथळे निर्माण करीत उभी करण्यात आलेली वाहने पोलीस प्रशासनाने उचलून नेत वाहनधारकांना दंड आकारला आहे. शहरात कुठेही वाहने उभी केली जातात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन या वाहनचालकांवर कारवाई करीत असले तरी हा प्रकार कमी झालेला नाही.
वसमत रस्त्याचे काम संथगतीने
परभणी : राष्ट्रीय महामार्गांतर्गत असलेल्या वसमत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. असोला पाटीपासून ते झीरो फाट्यापर्यंत सध्या हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी एका बाजूने रस्ता पूर्णत: खोदून ठेवला असून, एका बाजूने काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना खोदून ठेवलेल्या एकेरी रस्त्यावरून वाहतूक करावी लागते. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात तिसरे आवर्तन पूर्ण
परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून रबी हंगामासाठी जिल्हावासीयांना पाण्याचे तिसरे आवर्तन मिळाले आहे. त्यासाठी डाव्या कालव्याला पंधरा दिवस पाणी होते. हे पाणी आता बंद करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच रबी हंगामात पाण्याचे तीन आवर्तन प्राप्त झाल्याने यंदा सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे.
बसगाड्यांना तोबा गर्दी
परभणी : जिल्ह्यात संचारबंदी काळातही बसगाड्यांना तोबा गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस जिल्ह्यातील आगारांमधून बससेवा बंद ठेवण्यात आली होती; मात्र जिल्ह्याबाहेरील बसवाहतूक सुरूच होती. या बसना प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाले. प्रशासनाने मात्र कोणतीही कारवाई केली नाही.