खड्ड्यांमुळे वाढला नागरिकांचा त्रास
परभणी : शहरातील सुपर मार्केट ते मोठा मारुती या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील हा प्रमुख मार्ग असून, या मार्गावर २० ते २५ वसाहतींमधील नागरिक दररोज वाहतूक करतात. मात्र, खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वसमत रस्त्याचे काम संथगतीने
परभणी : वसमत रस्त्याच्या निर्मितीचे काम संथगतीने सुरू आहे. असोला पाटी ते झिरो फाटा या रस्त्यावर सध्या काम केले जात असून, एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्याने वाहनधारकांना एकेरी रस्त्यावरूनच वाहतूक करावी लागते. या मार्गावर असलेली वाहतूक लक्षात घेता महामार्ग प्राधिकरणाने हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
बाजारपेठ भागात नागरिकांची गर्दी
परभणी : शहरातील बाजारपेठ भागांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून, दररोज फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. मनपा प्रशासन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत असले तरी फिजिकल डिस्टन्सच्या संदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
पालम तालुक्यातील
शेतकरी अडचणीत
परभणी : पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी नांदेडसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या बंधाऱ्याच्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली होती. मात्र, आता पाणी शिल्लक राहिले नसल्याने पिकांच्या सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्टेडियममधील स्वच्छतागृहाची दुरवस्था
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम भागात खेळाडूंसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात घाण झाली असून, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतागृहांअभावी खेळाडूंची कुचंबणा होत आहे.
जि. प. इमारतीचे काम संथगतीने
परभणी : शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम संथगतीने होत असल्याने जिल्हा परिषदेच्या कार्यालयांचे स्थलांतर लांबणीवर पडत आहे. सध्या शहरातील विविध भागात जिल्हा परिषदेचे कार्यालय कार्यरत आहेत. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार असल्याने बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
शहरातील उद्यानांना अवकळा
परभणी : शहरातील सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली असून, उद्यान विकासाकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे. मागील दोन वर्षांपासून विकासकामे झाली नसल्याने दुरवस्थेत भर पडली आहे. नेहरू पार्क आणि शिवाजी पार्क या दोन्ही उद्यानांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.