परभणी : मनपाच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असतानाही शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका घरासमोर आणून पॉझिटिव्ह असल्याचे सांगत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या पॉझिटिव्ह अहवालासंदर्भात कोणतीही कागदपत्रे न आढळल्याने त्यास परत घरी रवाना करण्यात आले.
दरम्यानच्या काळात या कर्मचाऱ्याच्या घराचा परिसर महापालिकेने सील केला. काही वेळानंतर निगेटिव्ह अहवाल असल्याचे सांगत पुन्हा बॅरिकेटस् काढण्यात आले. आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांमधून मात्र चांगलीच धास्ती निर्माण झाली असून संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
येथील महानगरपालिकेत आरोग्य विभागात काम करणारा एक कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने १५ जुलै रोजी स्वत: हून विलगीकरण कक्षात दाखल झाला होता. १६ जुलै कर्मचाऱ्याने स्वॅब नमुना दिला. त्याचा अहवाल साधारणत: तीन ते चार दिवसांनी येणे अपेक्षित असताना ८ दिवसांनी उशिरा प्राप्त झाला. अहवाल निगेटिव्ह आला. पण संबंधितांना तो पॉझिटिव्ह वाटला.