बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक केली आहे. आणखी एका आरोपीचा सीआयडीने शोध सुरू केला आहे. आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत, आज परभणीत मोर्चा काढण्यात आले. परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून १२:३० वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते. भाजपाचे आमदार सुरेश धस उपस्थित होते. यावेळी आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी सारेच आक्रमक, परभणीत हजारोंचा मुकमोर्चा
"संतोष देशमुख यांची मुल दहावीला आहेत, त्यांनी तुमचं बिघडवलं होतं. तो एका दलिताला वाचवायला आला होता, म्हणून मारला. संतोषला मारत असल्याचा व्हिडीओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल. पण, जर आकाच्या आकाला दाखवला असेल आणि जर त्यांनी पाहिला असेल तर आकाचे आका 'करलो जल्दी तयारी हम निकले है जेल वारी'असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
सुरेश धस म्हणाले, यांना मोक्का लागला पाहिजे. एकदा आत गेले की चार, पाच वर्षे नमस्ते लंडन. आकाच्या आकाने जर यात काही केलं असेल तर त्यांचाही यात नंबर लागू शकतो, असंही आमदार धस म्हणाले. गेल्या दहा वर्षापासून थर्मल जवळ जबरदस्ती सुरू आहे, कोणीही जातंय आणि जबरदस्ती घेऊन येत आहे, असा आरोपही धस यांनी केला. ज्यांनी आमच्या आजोबा, पंजोबांच्या जमिनिवर विमा भरला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
यावेळी सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. 'अजितदादा तुमचा वादा काय झाला, संदीप दिघोळेपासून ते आता संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंत हिशोब करा. या हत्या कोणी केल्यात पाहा. अजितदादा तुम्ही यांना अजून कसे ठेवले आहे, असा सवालही धस यांनी केला.
सर्वांना मकोका लावा : आ. सुरेश धस
आ. सुरेश धस म्हणाले की, आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची समिती, एसआयटी व न्यायालयीन चौकशीमुळे एकही आरोपी सुटणार नाही. आरोपींचा आका अन् आकाचा आका याचाही नंबर लागू शकतो. फक्त या आरोपींना मकोका लावा. म्हणजे चार ते पाच वर्षे बाहेरच येणार नाहीत. संगीत दिघोळे ते संतोष देशमुखपर्यंत परळीत किती हत्या झाल्या, त्यामागे कोण आहे, हे तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीहून माणसे पाठविली पाहिजे. तर धनंजय मुंडे मंत्री राहिले तर हे असेच सुरू राहील. त्यांच्याऐवजी परभणीतील राजेश विटेकरांना मंत्री करा, कायंदेंना करा, सोळंकेंना करा, असे आधीच अजित पवारांना सांगितले आहे. पीकविमा घोटाळ्याच्या परळी पॅटर्नमध्ये परभणीतही ४० हजार हेक्टरचा बोगस पीकविमा काढला. राजेश विटेकरांनी यावर पत्रकार परिषद घ्यावी, असेही ते म्हणाले. तर परळी थर्मलच्या राखेचे कंत्राट वारंवार घेणाऱ्यांची यादीच वाचून दाखविली. २० वर्षे थर्मलचे अधिकारी एकाच जागी राहतात कसे, असा सवालही केला. तर गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे सहभागी न झाल्याने त्यांचे इकडे एक, तिकडे एक चालते. हे वागणे बरे नव्हे, असा टोला लगावला.