तळणी (जालना) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपवि•ाागीय कार्यालयात तोडफोड केली. वेळोवेळी मागण्या करूनही शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांचे प्रश्न सोडविण्याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. रोहित्र जळालेले असताना ते दुरूस्त करून दिले जात नाहीत. त्यामुळे अनेक गावे अंधारात असून, शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. शहरी, ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष करीत थकीत वीजबिलाच्या वसुलीचे कारण पुढे करीत गावा-गावातील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. शेतकरी, सर्वसामान्यांसमोर असलेला विजेचा प्रश्न सोडविण्याऐवजी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवनिर्माण सेनेचे सिध्देश्वर काकडे, सचिन काकडे, संतोष सहा (रा. जयपूर ता. मंठा) व इतर कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरण कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यापूर्वीही तीव्र आंदोलनयापूर्वी मनसेच्या या कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंचायत समिती कार्यालयातही तोडफोड केली होती. या प्रकरणात संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल आहेत. या कार्यकर्त्यांनी आता विजेच्या प्रश्नावर खळखट्याक आंदोलन करीत महावितरणला ‘झटका’ दिला आहे.