परभणी : मोबाइलच्या क्रांतीनंतर मोबाइलवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ही डिपेंडन्सी नागरिकांच्या स्मरणशक्तीसाठी घातक ठरू लागली असून, पाठांतराचे प्रमाण कमी झाल्याने दैनंदिन जीवनावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पूर्वी दूरध्वनी क्रमांक असो अथवा एखादी महत्त्वाची बाब मुखपाठ असायची; परंतु आता मोबाइलचा वापर वाढला तसा मेंदूचा वापर कमी होत चालला असून, ही बाब धोकादायक ठरू शकते.
असे का होते?
एखाद्या व्यक्तीवर अथवा यंत्रावर अवलंबून राहिल्यानंतर स्वतःची कार्यक्षमता कमी होते. असाच प्रकार मोबाइलच्या बाबतीत होत आहे.
मोबाइलमध्ये नावासह क्रमांक नोंदविलेले असल्याने ते आपण जास्त गांभीर्याने घेत नाहीत. परिणामी, मोबाइल क्रमांक मुखपाठ राहत नाहीत.
त्याचप्रमाणे जवळच्या नातेवाइकांचे वाढदिवस, दैनंदिन करावयाची कामे या बाबीही मोबाइलमध्ये नोंद केल्या जात आहेत. त्यामुळे स्वतःच्या शक्तीचा वापर कमी होतो. परिणामी याबाबी स्मरणात राहत नाहीत.
हे टाळण्यासाठी
स्वतःची स्मरणशक्ती तल्लख करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना स्वावलंबनाचे धडे द्यावेत. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी छोट्या-छोट्या ट्रिकचा वापर करावा. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या छोट्या छोट्या खेळांचा वापर मुलांकडून करून घ्यावा, यंत्रांचा अनावश्यक वापर टाळावा.
माणसाची डिपेंडन्सी वाढली की, आपोआपच स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. स्वतःच्या मेमरीचा कमी वापर केल्याने असे प्रकार होतात. त्यामुळे अनावश्यक बाबींसाठी यंत्रांवर विसंबून राहू नये, प्रत्येकाला दोन स्मरणशक्ती असतात. एक शॉर्ट टाइम आणि एक परमनंट मेमरी. यंत्रांच्या वाढत्या वापरामुळे परमनंट मेमरीमध्ये काही गोष्टी ठेवण्याची सवय मोडत आहे. त्यामुळे स्वावलंबन वाढवून मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-डॉ. जगदीश नाईक, मानसोपचारतज्ज्ञ