परभणी : ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल आला असून, त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी वर्षभर शाळा बंद राहिल्या. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांपासून दूर ठेवलेले ॲन्ड्राइड मोबाइल नाईलाजाने पालकांना त्यांच्या हातात द्यावे लागले. साधारणत: दोन ते तीन तास ऑनलाइन अभ्यासक्रम आणि त्यानंतर मोबाइलवरच गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही विद्यार्थी मोबाइल हातात घेत असून, मागील वर्षभरापासून मोबाइलचा वाढलेेला हा वापर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करीत आहे. डोळ्यांच्या समस्या, वारंवार डोके दुखणे, कमी वयात चष्मा लागणे या प्रमुख कारणांबरोबरच शारीरिक आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. मैदानी खेळ जवळपास बंद झाले असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे शिक्षण प्रक्रिया सुरू राहिली असली, तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे या संदर्भात पालकांनीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुले कायम मोबाइलवर
ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना ॲन्ड्राइड मोबाइल खरेदी करून दिले. जेमतेम दोन ते तीन तासांचा ऑनलाइन अभ्यासक्रम असला, तरी त्या व्यतिरिक्तही मोबाइलचा वापर वाढला आहे. जास्तीतजास्त वेळ मुुले मोबाइलवर वेगवेगळे गेम खेळत असल्याचे चित्र शहरी भागात घराघरात पाहावयास मिळत आहे. मोबाइलच्या अति वापरामुळे मुलांना डोळ्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत, तसेच त्यांची एकाग्रताही खंडित होत असल्याचे दिसून येत आहे.
विटीदांडू गायबच
मैदानी खेळांसाठी पूर्वी विटीदांडू, लिंगोरच्या, सूरपारंब्या आदी खेळ खेळले जात होते. मात्र, मागच्या काही वर्षांपासून हे खेळ लुप्त झाले आहेत. ग्रामीण भागात कुठेतरी सूरपारंब्या खेळताना मुले दिसतात, परंतु शहरी भागात मात्र या मैदानी खेळांकडे मुलांनी चक्क पाठ फिरविली आहे. वसाहतीतील रस्त्यावर क्रिकेट, बॅडमिंटन मात्र खेळले जात असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे मोबाइल गेम खेळण्याचे प्रमाण वाढले
विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल आल्याने मोबाइलवर गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ५५ टक्क्यांपर्यंत आहे. शहरी भागात ही संख्या अधिक असून, ग्रामीण भागात मात्र अजूनही विद्यार्थी मैदानावर येतात. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने मैदानी खेळ टिकून आहेत, असे क्रीडा शिक्षक कैलास माने यांनी सांगितले.