परभणी शहरात वर्दळीच्या ठिकाणी चोर मोबाईलची चोरी करून हात साफ करीत आहेत. हे प्रमाण लॉकडाऊननंतर वाढले आहे. मागील काही दिवसांमध्ये रेल्वे स्टेशन तसेच बसस्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ वाढल्याने या ठिकाणाहून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. शासकीय कार्यालयाच्या परिसरातूनही मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. परंतु, तक्रारदार पुढे येत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. आता सर्वच मोबाईल आकाराने मोठे आणि महागडे आहेत. यामुळे हातात ते मोबाईल धरताना काळजी घेणे गरजेचे आहे. मोबाईल चोरीच्या घटना घडू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
या भागांमध्ये मोबाईल सांभाळा
शहरात बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उद्यान परिसर, शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ तसेच काही शासकीय कार्यालये व जिल्हा रुग्णालयात वर्दळीच्या परिसरात मोबाईल चोरी होते. मात्र, या ठिकाणी पोलीस प्रशासन चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष करते.
चोरी नव्हे, गहाळ म्हणा...
कोणत्याही ठिकाणाहून मोबाईल चोरीला गेल्यानंतर संबंधित मोबाईलधारक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी गेल्यावर या चोरीची नोंद गहाळ म्हणून केली जाते. मोबाईल गहाळ झाल्याचा तपास पोलीस करतात. अनेक जण सीम कार्ड व त्यातील महत्त्वाचा डाटा मिळविण्यासाठी तक्रार करतात. यानंतर ही तक्रार सायबर विभागाकडे दिली जाते. सायबरकडे संबंधित मोबाईल स्ट्रेस करण्यात आला. स्ट्रेस झालेला मोबाईल सापडतो अन्यथा हरवलेला अथवा चोरी गेलेला मोबाईल सापडणे कठीण आहे.
चोरलेल्या मोबाईलची विक्री होते
चोरी केलेल्या अनेक मोबाईलची विक्री परस्पर केली जाते. यामध्ये काही ठिकाणी चोरी उघडकीस येते, तर अनेक प्रकरणांमध्ये मोबाईल चोरी गेल्यावर शोधही लागत नाही.
सायबरकडे २३० मोबाईल गहाळ झाल्याची नोंद
जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत एकूण २३० मोबाईल गहाळ झाल्याची नोंद सायबर विभागाकडे आली आहे. यातील ८२ मोबाईलचे लोकेशन स्ट्रेस झाले आहे. ६० मोबाईलची माहिती बाकी आहे. उर्वरित मोबाईलचा तपास सुरू असल्याचे समजते.