परभणी : येथील आरोपी टोळी प्रमुख नितेश उर्फ भैय्या देशमुख आणि सदस्यांविरुद्ध दाखल केलेला मोक्का प्रस्ताव नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी मंजूर केला असून, या आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नितेश प्रकाशराव देशमुख व टोळीविरुद्ध २००७ पासून आजपर्यंत १९ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, अपहरण, दंगा, शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध हल्ला आदी गुन्ह्याचा समावेश आहे. या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत हिंसक आहे. सुपारी घेऊन खून करणे, दोन पक्षाच्या वादातील पैशांच्या वसुलीसाठी एका पक्षाकडून सुपारी घेऊन पैसे वसूल करणे असे प्रकार सातत्याने केले जात होते.
या गुन्हेगारी अभिलेख्यांवरून नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यामार्फत पोलीस उपमहानिरीक्षकांकडे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता.
या प्रस्तावातील अभिलेख्यांची आणि कायदेशीर बाबींची पडताळणी करून पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी टोळी प्रमुख नितेश उर्फ भैय्या प्रकाशराव देशमुख आणि टोळी सदस्य मनोज भगवान पंडित, किशोर गणेश बोचरे यांच्या विरुद्धच्या मोक्का प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांच्याकडे सोपविला आहे. तिन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे, टोळी प्रमुख व सदस्यांविरुद्ध मोक्का, हद्दपार, स्थानबद्धसारखी कारवाई होऊनही त्यांच्या टोळीचे बेकायदेशीर कृत्य करणे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे कृत्य सुरूच असल्याने ही टोळी मोक्का अंतर्गत कारवाईसाठी पात्र ठरत असल्याने या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.