२४ जून रोजी रिजवान खान शफीक खान व त्यांच्या टोळीने जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार करून दहशतीचे वातावरण तयार केले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. या प्रकरणातील आरोपी रिजवान खान शफिक खान व टोळीने २०१४ पासून आतापर्यंत १३ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे केले आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, गृह अतिक्रमण करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला करणे, घातक हत्यारांनी जबर दुखापत पोहोचविणे आदी प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी या टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यामार्फत आणि शिफारसीवरून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्याकडे सादर केला होता. निसर तांबोळी यांनी या प्रस्तावातील अभिलेखांची व कायदेशीर बाबींची पडताळणी केली. त्यानंतर टोळी प्रमुख रिजवान खान शफीक खान तसेच सदस्य आसिफ खान अहमद खान पठाण, मो. रिजवान उर्फ एमआरपी मो. रफिक, अबू अली चाऊस हाऊस अमजद चाऊस, झियाउद्दीन इनामदार सलाउद्दीन इनामदार, मोहम्मद रफीक मो. युनूस यांच्याविरुद्ध मोक्का प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.