जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा व सलग चार वेळा शेतकरी कामगार पक्षाच्या अत्यंत साधारण उमेदवाराला निवडून देणारा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात १९८९ च्या विधानसभा निवडणुकीपासून पैशांच्या वापराला सुरुवात झाली. १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पैशांच्या बळावर धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून निवडणुका जिंकल्या. त्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदार संघात पैशांचा वापर अधिकच वाढला आणि येथून पुढे या मतदार संघाच्या अधोगतीला सुरुवात झाली, असे जुन्या जाणत्या राजकीय समीक्षकांबरोबर सुजाण मतदारांतून बोलले जाऊ लागले.
निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या धनदांडग्यांनी प्रत्येक वेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावत विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केल्याने स्थानिक विकासकामांना बगल मिळाली. विधानसभा निवडणुकीत वापरलेले पैशांचे फंडे पुन्हा शहरातील नगरपरिषद निवडणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत वापरले जाऊ लागले. जो अधिकचा पैसा खर्च करेल, तोच सत्तेत येऊ लागल्याने विधानसभा निवडणुकीतील पैशांचे लोण गावपातळीवरील ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यानही गावपातळीवर बोली लागत आहे. जो जास्त रकमेची बोली लावेल, त्याच्याच ताब्यात ग्रामपंचायतीच्या चाव्या जात आहेत. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची ऐसीतैसी केली जात असल्याने गावागावातील मूलभूत सुविधांबरोबरच विकासकामांनाही बगल मिळत आहे. त्यामुळे परिसरातील विकासकामे बाजूला पडत आहेत. निवडणुकीदरम्यान होत असलेल्या पैशांच्या वापराला ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाने सजग व्हावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.