परभणी : पालम नगरपंचायत निवडणुकीत मतदाराला पैसे वाटप करीत असताना निवडणूक विभागाच्या पथकाने उमेदवारासह इतर सहा जणांना रंगेहाथ पकडले आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचाही समावेश आहे. दरम्यान, कारवाई करीत असताना आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचाही प्रकार घडला आहे.
पालम नगरपंचायतीची निवडणूक सध्या गाजत आहे. या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे गायब झाले असून, लक्ष्मीअस्त्राचा वापर होत असल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून होत होती. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने फिरते गस्त पथक नियुक्त केले होते. १९ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पालम शहरातील हाके गल्ली येथे मधुकर बळीराम हाके यांच्या घरी पैसे वाटप होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याअधारे गस्ती पोलीस कर्मचाऱ्यांसह हे पथक हाके गल्ली येथील मधुकर हाके यांच्या घरी दाखल झाले. तेव्हा सात जण त्या ठिकाणी उपस्थित होते. एका जणाच्या हातात पैसे होते. या व्यक्तींकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. याच दरम्यान, बाबुराव कवडे आणि पैसे वाटप करणारे लाल खान पठाण हे दोघे त्या ठिकाणाहून पळून गेले. पालम नगरपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्र.१४ मध्ये लाल खाँ पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करावे, यासाठी स्वत:च्या फायद्यासाठी पैशांचे आमिष दाखविल्याची माहिती यावेळी पुढे आली.
या प्रकरणी पथकप्रमुख आकाश प्रकाश पौळ यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून मतदारांना पैशांचे आमिष दाखविणे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून लाल खाँ पठाण, बापुराव कवडे, रमेश दत्तराव वाघमारे, अलीमखाँ पठाण, ज्ञानोबा संताजी घोरपडे, भागवत निवृत्ती हाके, मधुकर बळीराम हाके या सात जणांविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.