पूर्णा (परभणी) : झिरो फाटा मार्गावर रस्त्याच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. आज सकाळी १० वाजता एका निवृत्त प्राध्यापकाचा मोपेडवरील ताबा सुटून अपघात झाल्याने मृत्यू झाला. सुभाष नरोजी ढोणे असे मृताचे नाव असून अपघातात त्यांची मुलगी सुद्धा गंभीर जखमी झाली आहे.
पूर्णा ते झिरो फाटा या 20 की मी रस्त्याचे मागील काही दिवसांपासून काम सुरु आहे. या रस्त्यावरील लक्ष्मीनगर पाटी परिसरात दोन्ही टप्प्यातील अर्धा कि. मी. चे काम रखडलेले आहे. या ठिकाणीच वारंवार अपघात होत आहेत. आज सकाळी पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष ढोणे (68 वर्ष) हे कोमला या त्यांच्या मुली सोबत मोपेडची पासिंग करण्यासाठी परभणी कडे जात होते. सकाळी १० वाजेच्या दरम्यान लक्ष्मीनगर पाटी जवळ खडबडीत रस्त्यावर त्यांचा मोपेडवरील ताबा सुटला. यामुळे ते तोल जाऊन खाली पडले, यात ढोणे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने ते बेशुद्ध झाले तर कोमलसुद्धा गंभीर जखमी झाली.
याचवेळी मधुकर खराटे, राम भुसारे व इतर काही नागरिकांनी दोघांनाही खाजगी वाहनाने पूर्णा येथील एका रुग्णालयात दाखल केले. परंतु, ढोणे यांची प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथे हलवण्याचा सल्ला दिला. नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले असता दुपारी 3 वाजेता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. मागणी करूनही रस्त्याचे काम न झाल्याने हा अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे झाला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.