परभणी- बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्या, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज शहरातील गव्हाणे चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मोठा गावा-वाजा करुन मोदी सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजना, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया, दीन दयाल ग्रामीण कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना या योजना फेल ठरल्या आहेत. त्यामुळे या योजना बंद कराव्यात.दरवर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने रोजगार उपलब्ध करुन न देता बेरोजगारीमध्ये वाढ केली आहे. केवळ आश्वासन न देता बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी गव्हाणे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
त्यानंतर दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. वक्त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, मारोतराव बनसोडे, सिद्धांत हाके आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पहा व्हिडीओ :