परभणी : दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील ३८ महसुल मंडळे आणि ८ तालुक्यात पिक विमा नाकारणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देणे अपेक्षित असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले आहे. याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शनिवार बाजार येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. नानलपेठ, शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.