सेलू तालुक्यातील राजा ग्रामपंचायतीचे सर्वाधिक म्हणजे ९३.६५ टक्के विक्रमी मतदान झाले. या ठिकाणच्या तीनही वॉर्डांत ७२४ पैकी ६७८ मतदारांनी आपला हक्क बजावला. पिंपरी बु येथेही तीन वाॅर्डांत ५०८ पैकी ४६९ मतदारांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी ९२.३२ अशी आहे. तर, पिंपळगाव गोसावी येथील तीन वाॅर्डांत ७०५ पैकी ६५० मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ९२.३२ अशी आहे.
लक्षवेधी लढतीच्या ग्रामपंचायत निकालाकडे नजर
सेलू तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी झोडगाव येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना अशी लढत वगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली आहे. राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या वालूर, देऊळगाव गात, आहेर बोरगाव, हादगाव खु, कुंडी, मोरेगाव, देवगावफाटा, चिकलठाणा बु., रायपूर, शिराळा, सिमणगाव, गोसावी पिंपळगाव, राजा, काजळी रोहिणा येथील निकालाकडे नजरा लागल्या आहेत.