लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद दरम्यानच्या रस्त्याचे काम मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल १७ महिन्यांपासून सुरु असलेल्या या रस्ता कामात आता दुभाजकाऐवजी जाळ्या बसविण्याची तयारी मनपाने सुरु केली आहे.परभणी शहरातील प्रमुख रस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या निकषाप्रमाणे व्हावेत, यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद चार वर्षापूर्वी करण्यात आली होती. यामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद या रस्त्याचा समावेश आहे. तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध करुन दिला असतानाही रस्ता कामाच्या मूळ अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने काम करण्याचा प्रकार सातत्याने सदरील कंत्राटदाराकडून सुरु आहे. प्रारंभी वर्षभरात हे काम पुर्ण होणे आवश्यक होते; परंतु, तब्बल १७ महिन्यांपासून हे काम सुरुच आहे. सदरील कंत्राटदाराला दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला होता; परंतु, नंतर मनपाने हा निर्णय थंडबस्त्यात टाकून दिला. तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी या रस्ताकामाकडे वैयक्तिक लक्ष दिले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा फुले यांच्या नियोजित पुतळ्यापर्यंतचे काम चांगल्या दर्जाचे झाले. या कामाची नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी वेळोवेळी तपासणी केल्याने कामाचा चांगला दर्जा टिकून राहिला; परंतु, रेखावार यांची बदली झाली आणि या रस्ता कामातील मनमानीला सुरुवात झाली. महात्मा फुले यांचा नियोजित पुतळा ते शाही मशीद या दरम्यानच्या रस्त्याचे काम वेगाने करण्यात आले. तज्ज्ञांच्या तपासणीला खो देण्यात आला व हे काम उरकून घेण्यात आले. आता पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामात मनमानी सुरु आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्याची मूळ अंदाजपत्रकात तरतूद होती; परंतु, या रस्त्याच्या प्रारंभापासून दुभाजकाऐवजी लोखंडी जाळ्या टाकून त्यामध्ये शोभेची झाडे लावण्याचा खटाटोप मनपाकडून सुरु आहे. सदरील जाळ्या तकलादू असणार आहेत. शिवाय मूळ अंदाजपत्रकात याचा कुठेही समावेश नव्हता. तरीही कमी खर्चाची ही आयडिया मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर केली. त्यामुळे कंत्राटदाराचे फावल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन दिवसांपासून दुभाजकादरम्यान लोखंडी अँगल उभे करुन फरशीच्या आधारावर (कंत्राटदाराकडे सेंट्रींगचे साहित्य उपलब्ध नाही) कठडे तयार केले जात आहेत. त्यानंतर येथे माती आणून त्यामध्ये कन्हेरीची झाडे लावण्यात येणार आहेत.लोकप्रतिनिधीही मनपास जाब विचारेनात४मनमानी पद्धतीने अंदाजपत्रकाला खो देऊन रस्त्याचे काम केले जात असताना मनपातील विरोधी नगरसेवक मूग गिळून गप्प आहेत. शिवाय अन्य लोकप्रतिनिधीही याबाबतचा जाब मनपाला विचारण्यास तयार नाहीत. सत्ताधारी नगरसेवक किंवा पदाधिकारीही याबाबतचा जाब प्रशासन किंवा कंत्राटदारास विचारत नाहीत. त्यामुळे कंत्राटदाराकडून बिनदिक्कतपणे हे काम सुरु आहे. शिवाय या रस्त्याच्या बाजुला तयार केलेल्या नाल्यांवर कोठे ढापे टाकले आहेत तर कुठे टाकलेले नाहीत.
परभणीतील बहुचर्चित रस्ता:अंदाजपत्रकास बगल देऊन रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:52 AM