पूर्णा (जि.परभणी) : चुडावा शिवारात नांदेड- पूर्णा राज्य रोडवरील दुचाकी-ट्रॅक्टरच्या अपघातात आईसह चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना ११ जानेवारी रात्री साडेसात ते साडेआठच्या सुमारास घडली. यात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत.
पूर्णा तालुक्यातील चुडावा येथील महिलेला तिचा भाऊ रितेश देसाई दुचाकी क्रमांक (एमएच २२ बीबी ८०४८) ने चुडावावरून नांदेडच्या दिशेने कलमुला येथे बहिणीच्या सासरी दोन मुलीसह नेऊन सोडत असताना ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २६ बीक्यू ३७९९) च्या धडकेत स्वाती बालाजी लेडंगे (वय २५) व त्यांची चार ते पाच वर्षांची मुलगी या दोघींचा मृत्यू झाला. नातेवाईक व पोलिसांच्या मदतीने नांदेड येथे अंदाजे दोन ते तीन वर्षांची एक मुलगी व भाऊ रितेश ज्ञानेश्वर देसाई (१८) याच्या पायाला व हाताला गंभीर इजा झाल्याने नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचारास हलविले.
चिमुकलीवर सुद्धा उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली, तर मयत महिला व तिच्या चिमुकलीवर तिच्या सासरी रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयस्पर्शी घटनेने चुडावा, कलमुलासह परिसरात शोककळा पसरली आहे.