बामणी (जि.परभणी) : जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथे विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू झाल्याची घटना ३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून, हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील उषा शिवाजी खंदारे (४०) आणि आकांक्षा शिवाजी खंदारे (१८) या माय-लेकींचा मृतदेह त्यांच्या शेतालगत असलेल्या कल्याण तात्याराव खंदारे यांच्या विहिरीत शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास आढळून आला. याबाबतची माहिती गावातील पोलीस पाटील छाया उद्धवराव तनपुरे यांनी बामणी पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, सहायक पोलीस निरीक्षक गिरी, फौजदार हनुमंत नागरगोजे, जमादार पिंपळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दोघींचेही शवविच्छेदन केले. सद्यस्थितीत या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेस आणखी २० व १४ वर्षे वयाची दोन मुले आहेत. दरम्यान, या माय-लेकींचा अपघाती मृत्यू झाला की घातपात झाला? याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस तपासात ही बाब समोर येणार आहे.