पालम (परभणी ) : माहेरी जाणाऱ्या भावजयीला दिराने केलेल्या मारहाणीत तिचे नाक तुटल्याची घटना पालम शहरातील पेठपिंपळगाव चौकात गुरुवारी (दि. १० ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गंगाखेड तालुक्यातील गुंडेवाडी येथील चिंगले कुटुंबात अंतर्गत वाद झाला होता. त्यामुळे रंजना चिंगले ह्या मुलांना घेऊन त्यांचे भाऊ रघुनाथ किशन आराटे (रा.पारडी बु. ता.वसमत) याच्यासोबत माहेरी निघाल्या. ही माहिती रंजनाचे दीर उमाकांत नागोराव चिंगले याला समजली. शहरातील पेठपिंपळगाव चौकात चिंगले याने दोघांनाही गाठले. माझ्या भावाच्या लेकरांना का घेऊन जात आहेस ? असे विचारत त्याने दोघांनाही लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत रंजना व त्यांचे भाऊ गंभीर जखमी झाले. मारहाणीत रंजना यांच्या नाकावर गजाचा जोरदार वर झाल्याने त्यांचे नाक तुटले आहे. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रघुनाथ किशन आराटे यांच्या फिर्यादीवरुन उमाकांत नागोराव चिंगले (रा.गुंडेवाडी ता.गंगाखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जमदार मदन सावंत, गोविंद चुडावकर तपास करीत आहेत.