परभणी: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुका नात्या-गोत्यातील लढतींनी काही ठिकाणी गाजत आहेत. कुठे सासू-सून तर कुठे जावा-जावा, मेहुणे-मेहुणे आणि भाऊ बंदकीत लढतीमध्ये होत असून या लढतींनी निवडणुकीत चांगलीच रंगत भरली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरील महत्त्वाची निवडणूक मानली जाते. या निवडणुकीमध्ये नेहमीच नात्या-गोत्याच्या लढती रंगतात. जिंतूर तालुक्यात अकोली येथे भावकी आणि सोयरे एकाच वाॅर्डात असल्याने लढत आहेत. एकाच भावकीतील तीन उमेदवारांची समोरासमोर सोयरे असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांशी लढत होत आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये राणीसावरगाव या गावातही भावकी-भावकीत लढत होत आहे. प्रभाग ३ मध्ये सोनाली जाधव, मनीषा जाधव, कल्पना जाधव यांच्यात तर प्रभाग २ मध्ये बबिता ज्ञानेश्वर जाधव व प्रतिभा ज्ञानेश्वर जाधव या भाऊबंदकीत लढत होत आहे. सोनपेठ तालुक्यात गवळी पिंपरी येथे किरण उबाळे व शशिकांत भोसले या दोन मेहुण्यांत लढत होत आहे. तर वडगाव येथे आशाताई प्रल्हाद बचाटे यांची लढत त्यांच्या चुुलत सासू सखुबाई रामेश्वर बचाटे यांच्यामध्ये होत आहे. पूर्णा तालुक्यातही फुलकळस येथे शिवकुमार विश्वनाथ शिराळे व त्यांचे चुलतभाऊ विकास गणपत शिराळे आमने-सामने आहेत. तर चुडावा येथे विनायक आबाजी देसाई यांचा सामना त्यांचे चुलत पुतणे सुभाष पांडुरंग देसाई यांच्याशी होत आहे.
सासू-सुनेत लढत
सेलू तालुक्यातील घोडके पिंपरी येथील निवडणूकही नात्यातील लढतीने गाजत आहे. एका बाजूला सासू तर दुसऱ्या बाजूला सून निवडणुकीच्या रिंगणात आहे. पिंपरी येथील वाॅर्ड क्रमांक २ मध्ये नंदा भक्त पांचाळ एका पॅनलकडून रिंगणात आहेत. तर दुसऱ्या पॅनलकडून त्यांची सून शारदा नितीन पांचाळ उमेदवार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सासू विरुद्ध सून अशी लढत होत असून कोण बाजी मारहाण, याकडे लक्ष लागले आहे.
देवगावफाटा ग्रामपंचायतीत वाॅर्ड क्रमांक २ मध्ये मनीषा गोविंद मोरे विरुद्ध शीतल पवन मोरे या चुलत जावा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काजळे रोहिणा येथे वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये नामदेव राणोजी सुतार यांच्याविरुद्ध त्यांची चुलत सून रंजना संजय सुतार यांच्यात लढत आहे.
पिता-पुत्र सामने-सामने
परभणी तालुक्यातील मांगणगाव येथे वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये पिता-पुत्रात लढत होत आहे. या ठिकाणी भास्करराव कळसाईतकर यांच्याविरुद्ध त्यांचा मुलगा अमोल भास्करराव कळसाईतकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.
पती-पत्नी बिनविरोध
पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत पती आणि पत्नी दोघेही ग्रा.पं.सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश उत्तमराव ढगे आणि त्यांच्या पत्नी शीला सुरेश ढगे हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.