गंगाखेड (परभणी ) : प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या गरोदर महिलेचा प्रसुतीनंतर आज सकाळी साडेदहा वाजेच्या मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
पालम तालुक्यातील बोरगाव (खु.) येथील भागवत गंगाधर कदम यांची मुलगी सिमा दिपक मोरे ( वय २२ वर्ष रा. भनगी ता.जि. नांदेड. हल्ली मुक्काम बोरगाव (खु.) ) यांना प्रसुतीकळा येत असल्याने आज सकाळी ९ वाजता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत सिमा यांची साधारणपणे (नॉर्मल) प्रसुती झाली व त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याचे सिमा यांच्या आईला लक्षात आले. त्यांनी ही गोष्ट प्रसुती कक्षाबाहेर असलेले भागवत कदम यांना सांगितली व त्यांनी रुग्णालयात उपस्थित परिचारिकाना याची माहिती दिली. प्रसुतीनंतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे सिमा मोरे यांची प्रकृती खालावत गेली. त्यातच सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली.
डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा आरोप सिमा यांचा मृत्यू झाल्याचे समजताच भागवत कदम यांनी आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. यावेळी रुग्णालयात उपस्थित डॉक्टर रविंद्र देशमुख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरत आपला संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करीत डॉक्टर तसेच ड्युटीवर असलेले इतर कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.