पालम ( परभणी ) - मागील अकरा महिन्यांचे थकीत मानधन देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील हजारो निराधारांनी आज सकाळपासून येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले.
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना , वृध्दापकाल योजना मधील लाभार्थ्यांना मागील अकरा महिन्यांपासून शासनाचे मानधन मिळाले नाही. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही तहसील प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. यामुळे आज सकाळपासूनच हजारो लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. आंदोलनाचे नेतृत्व संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग होलगे यांनी केले. आंदोलनास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.