परभणी : सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालयाच्या हॉलच्या क्षमतेच्या निम्म्या आसन क्षमतेला परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी २ नोव्हेंबर रोजी ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
कोरोनाच्या संसर्गामुळे मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन आणि या क्षेत्रातील व्यवसायिकांची मागील पाच महिन्यांपासून आर्थिक नुकसान होत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या व्यवसायिकांना खुल्या पद्धतीने व्यवसायाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे मंडप, लॉन, मंगल कार्यालयाच्या हॉल क्षमतेपेक्षा निम्म्या आसन क्षमतेला परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी करीत व्यवसायिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. इतर शासकीय कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत आहेत, मात्र व्यवसायासाठी आम्हाला बंधन घातले जात आहे. हा आमच्यावर अन्याय असल्याची भावना या व्यावसायिकांनी आंदोलनातून व्यक्त केली.
सकाळी दहा वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलक व्यवसायिकांनी शासनाच्या धोरणाचा कडाडून निषेधही नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. टेंट, मंगल कार्यालय, बक्वेट हॉल, लॉन, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, साउंड, लाईट डेकोरेशन आणि या व्यवसायाशी संबंधित जीएसटी १८ टक्के ऐवजी ५ टक्के करावी, विवाह समारंभावर लागणारा जीएसटी वधूपित्याला परत मिळण्याची तरतूद करावी, परिस्थिती सामान्य होईपर्यंत या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम शासनाने जमा करावी, कर्ज धारकांचे व्याज माफ करावे, मंडप व्यवसायास उद्योगाचा दर्जा द्यावा यासह इतर ११ मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मिन्हाज फारूखी, शंकरराव तोडकर, मोहम्मद मेजहर पाशा, दीपक अग्रवाल, सखाराम दुधाटे, सुरेशराव पद्मगिरवर, शेख इफतेखार, बब्बूभाई, जवाहर पद्मगिरवार, यासीन भाई यांच्यासह अनेक व्यवसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते.