कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, मॅगझीन शुल्क आदी शुल्क माफ करण्याच्या तसेच प्रयोगशाळा व वाचनालयाच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्याच्या मागणीसाठी २८ जून रोजी एआयएसएफच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शैक्षणिक शुल्क माफी संदर्भात काही घोषणा केल्या होत्या. या घोषणांवर एआयएसएफ व विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे ५ जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येणार असल्याचे कॉ. राजन क्षीरसागर म्हणाले. खासगी संस्थाचालकांच्या दबावाला बळी पडून सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. याव्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून हिरावून घेतलेली ८३९ कोटींची फ्रीशीप ही पूर्ववत करणे ही महाविकास आघाडी सरकारची नैतिक जबाबदारी असूनही या मागणीकडे तसेच विद्यार्थ्यांची हक्काची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या मागणीसाठीही आंदोलन करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
शैक्षणिक शुल्क माफीसाठी मुंबईत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:13 AM