लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत. निम्न दुधना प्रकल्पातून दोन्ही कालव्याद्वारे पाणी सोडून शेतकºयांना दिलासा देण्यासाठी एक आॅगस्ट रोजी मुंबई येथे आ.विजय भांबळे, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली. दरम्यान, पालकमंत्र्यांनी संबंधितांना दोन ते तीन दिवसांत पाणी सोडण्याचे आदेश दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.एक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगामातील मूग, कापूस, सोयाबीन, तूर इ. पिके सुकत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांनी खरिपाची पेरणी केली. पिके वाढीसही लागली; परंतु, महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडले तर कालवा क्षेत्रातील शेतकºयांना पिके वाचविण्यास मदत होईल. यासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांसह विविध संघटनांनी केली होती.१ आॅगस्ट रोेजी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन आ.विजय भांबळे, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी मागणी केली.दरम्यान, कालव्यातून पाणी सोडल्यास सेलू, जिंतूर, मानवत परभणी तालुक्यातील बहुतांश शेतकºयांना दिलासा मिळेल.
कालव्यात पाणी सोडण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:15 AM