भूमिपूजनानंतर महिन्याभरातच हे कामच रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. रायगड कॉर्नरपासून ते दर्गापर्यंत असलेल्या या रस्त्यावर अनेक दिग्गज नेतेमंडळींची घरे आहेत. त्यातील काहींनी चक्क मनपाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. या रस्त्यालगत सद्यस्थितीत असलेल्या नालीवरच बांधकाम करण्यात आले आहे. हे अतिक्रमण या भागातील नागरिकांच्या दररोज निदर्शनास येते; पण मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची तसदी अद्याप घेण्यात आलेली नाही. आता नव्या आराखड्यानुसार हा ४० फुटाचा रस्ता होणार आहे. शिवाय मध्ये रस्ता दुभाजक आणि दुतर्फा नाली बांधकाम होणार आहे. एवढे काम करण्यासाठी मनपाला शासकीय जागेतील अतिक्रमण हटवावे लागणार आहे; परंतु हे अतिक्रमण हटविण्यास या दिग्गज नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे मनपाचे अधिकारी हतबल झाल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे भूमिपूजन होऊन १७ दिवस झाले तरी, प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. अतिक्रमण हटविण्याऐवजी सध्या आहे ती स्थिती ठेवून नव्याने मंजूर झालेले कामच रद्द करण्याचा घाट काही अतिक्रमण करणाऱ्या नेत्यांकडून घातला जात असल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी या भागातील नागरिक अस्वस्थ बनले आहेत.
दिग्गजांच्या अतिक्रमणामुळे पेडगाव रोडचे काम रद्द करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:13 AM