परभणी : जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, या अनुषंगाने मंगळवारी शिक्षण विभागाच्या पार पडलेल्या बैठकीत तयारीच्या अनुषंगाने चर्चा झाली.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. सध्या हा संसर्ग ओसरला असून, हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्याचबरोबर बंद असलेल्या शाळाही सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. या अनुषंगाने ६ जुलै रोजी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस प्रभारी शिक्षणाधिकारी (मा) विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी (प्रा) सुचिता पाटेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करीत शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावर्षीच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. अद्यापही शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मंगळवारी शिक्षण विभागात झालेल्या बैठकीमुळे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
शिक्षकांच्या होणार आरटीपीसीआर
कोरोना प्रतिबंधक निर्देशांचे पालन करीत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सुरुवातीला शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करणे, संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे नियोजन, याबरोबरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्या संदर्भात पालकांची संमती घेणे आदी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे लवकरच आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.