परभणी : आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत; परंतु महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेत महाविद्यालयेही सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील महाविद्यालये मागील दोन वर्षांपासून बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण होत असले तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही. इकडे शाळा सुरू करण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु महाविद्यालये सुरू करण्यासाठी अजूनही निर्णय झाला नाही. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. मात्र, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा महाविद्यालये केव्हा सुरू होतात, याची प्रतीक्षा विद्यार्थी व प्राध्यापकांनाही लागली आहे.
दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये आता कोरोनाविषयी बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू केल्या जाऊ शकतात, तर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. शिक्षणाची होत असलेली वाताहात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तेव्हा अधिक विलंब न करता महाविद्यालये सुरू करावीत.
-प्राचार्य विठ्ठल घुले
दीड वर्षापासून महाविद्यालये बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी आहेत, तसेच आमच्या अडचणी शिक्षकांसमोर मांडता येत नाहीत. त्यामुळे ऑफलाइन वर्ग सुरू होणे गरजेचे आहे.
-रवी खिल्लारे
ग्रामीण भागामध्ये अनेक वेळा वेबसाइट ओपन होत नाही. ऑनलाइन क्लास करतानादेखील अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तेव्हा महाविद्यालये सुरू करावीत.
-श्रद्धा काळदाते
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता, महाविद्यालयीन वर्ग ऑफलाइन सुरू करण्यात करणे गरजेचे आहे. शासनाने निर्णय घेतल्यास महाविद्यालयानेदेखील तशी तयारी केली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आणि योग्य ती काळजी घेत महाविद्यालये सुरू केल्यास विद्यार्थ्यांचेही नुकसान टळू शकेल.
-डॉ. श्रीधर भोंबे