परभणी : तालुक्यातील मुरुंबा ग्रामस्थांना वीज वितरण कंपनीचे रोहित्र देण्यावरुन झालेल्या वाद प्रकरणी परभणीचे खा.बंडू जाधव यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ मे रोजी रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली आहे.
२०१० मध्ये परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील काही नागरिक वीज वितरण कंपनीच्या रोहित्रासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने तत्कालीन आ.बंडू जाधव यांच्याकडे आले होते. तेव्हा आ.बंडू जाधव यांनी वीज कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आ.बंडू जाधव आणि कंपनीचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सावंत यांच्यात वाद झाला. त्यानंतर सावंत यांनी आ. जाधव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरुन कलम ३५३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणी होऊन कनिष्ठ न्यायालयाने बंडू जाधव यांना ३५३ अन्वये तीन महिन्यांची शिक्षा व २ हजार रुपये दंड आणि कलम ५०४ अन्वये एक महिन्याची शिक्षा सुनावली होती.
या निकालास खा. बंडू जाधव यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर न्यायाधीश श्रीखंडे यांनी ८ मे रोजी निकाल दिला. त्यात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल रद्द ठरवत तत्कालीन आमदार व विद्यमान खा. बंडू जाधव यांची शिक्षा रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली. खा. जाधव यांच्या वतीने अॅड. अशोक सोनी यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. पवन भुताडा, अॅड. अशिष सोनी यांनी सहकार्य केले.