परभणी : दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे एमपीएससी परीक्षांच्या तारखा लांबल्या जात आहेत. एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे. जर वेळेत परीक्षा झाली नाही तर या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने परीक्षेची तारीख जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी प्रशासनात चांगल्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या तयारीसाठी खासगी नोकरीला बाजूला ठेवून दोन-तीन वर्षे तयारीत घालविले जातात. मात्र मागच्या दीड वर्षापासून एमपीएससी परीक्षांच्या तारखा वेळोवेळी लांबविला जात आहेत. कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत एमपीएससी परीक्षा घेण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष वाया जात असून, अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर न करता अशीच परिस्थिती ठेवणे विद्यार्थी, प्रशासन आणि समाजघटकासाठी अहितकारक आहे. तेव्हा एमपीएससीच्या परीक्षा त्वरित द्याव्यात, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?
मागील वर्षी दोन वेळा एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आला. यावर्षीदेखील अद्याप परीक्षा घेण्यासंदर्भात प्रशासनाकडून तारीख जाहीर झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?
कोरोना संसर्गामुळे ऑफलाइन शिकवणी वर्ग घेण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस घेतले जात आहेत. मात्र ऑनलाइन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची तयारी अपेक्षेनुसार होत नाही. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी समजदार असतात. सध्या कोरोनाचा संसर्गही कमी झाला आहे. तेव्हा ऑफलाइन क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोट
शाळा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यात मोठा फरक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये समजदारपणा असतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे ठरावीक नियम घालून आणि विद्यार्थी संख्येची मर्यादा ठरवून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली पाहिजे. तसेच एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा होत नसल्याने नाउमेद होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर परीक्षा घेणे गरजेचे आहे.
- जगदीश कानडे