सेलू तालुक्यातील हदगाव पावडे येथील वीज समस्या व येथे मंजूर झालेल्या १३२ केव्ही वीज उपकेंद्रासाठी अधिग्रहित केलेली जमीन सोलर प्रकल्पाला देण्यात आल्याचा मुद्दा आ. मेघना बोर्डीकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मुंबई येथील अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यामध्ये सेलू तालुक्यात कृषी, उद्योग आणि नागरिकांना उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा, म्हणून मंजूर झालेले उपकेंद्र जमिनी अभावी नामंजूर करून सेलू तालुक्यात पुन्हा वीज समस्या निर्माण होत आहे, हे खरे आहे का? असा सवाल आ. मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर लेखी उत्तर देताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की, महापारेषण कंपनीने ११ जुलै २०१८ रोजी घेतलेल्या ठरावानुसार हदगाव येथील सर्व्हे न. २६७ व २६८ येथील जमीन महावितरण कंपनीला मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्पासाठी ३० वर्षांच्या भाडे करारावर हस्तांतरित करण्यात आली आहे. सदरील जमिनीवर २७ मे २०२० रोजी २.५९६ मे.वॅ. क्षमतेचा प्रकल्प आस्थापित झालेला आहे. सदर ऊर्जा प्रकल्प हा ३३/११ के.व्ही. हदगाव पावडे उपकेंद्राशी संलग्न आहे. या प्रकल्पामुळे सदर उपकेंद्राचा भार कमी होऊन सेलू तालुक्यातील इतर सर्व ग्राहकांना योग्य दाबाचा, चांगल्या दर्जाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. शिवाय सेलू तालुक्यात वीज समस्या निर्माण होत असल्याबाबतच्या तक्रारी महावितरण किंवा महापारेषण कंपनीकडे आलेल्या नाहीत.
सेलूतील वीज समस्येच्या तक्रारी महावितरणकडे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:33 AM