पाथरी (परभणी) : थकीत वीज वसुलीसाठी आलेल्या वीज वितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केल्यानंतर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप करत तसेच गावातील विजेचे पोल दुरुस्ती करून द्या नंतरच वसुली मागा अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयात कर्मचाऱ्यांना अक्षरशः कोंडून ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीती नंतर विज पुरवठा सुरू करण्यात आल्या नंतर कर्मचाऱ्यांची सुटका झाली हा प्रकार तालुक्यातील वडी येथे 27 मे रोजी दुपारी घडला
तालुक्यातील वडी येथे वीज वितरणचे अभियंता डिग्रसकर, कर्मचारी वाघ, पठाण यांचे पथक सकाळी 11 वाजेच्या सुमारास गावात दाखल झाले. थकीत वीजबिल वसुलीसाठी पथकाने गावातील पुरवठा खंडित केले. कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता गावचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने जवळपास २०० ग्रामस्थांच्या जमावाने पथकाला घेराव घातला. गावकरी नियमित बिल भरतात महावितरण गावातील 1965 सालच्या पोलची दुरुस्ती करा, गावात सिंगल फेज डीपी नसल्याने 12 तास वीज पुरवठा बंद असतो, तो सुरळीत करा त्यानंतरच थकबाकी वसुलीचे बोला, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
दरम्यान, ग्रामस्थ आणि महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. दुरुस्ती झाल्याशिवाय वीज पुरवठा खंडित करता येणार नाही, वीज पुरवठा जोडून दिल्या शिवाय गावातून बाहेर पडू दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेत सर्व कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायत कार्यालयात थांबवून ठेवले. ग्रामस्थांचा रोषाचा सामना करावा लागल्याने कर्मचाऱ्यांना नाईलाज झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले. गावचा वीज पुरवठा जोडून देऊन पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना गावाबाहेर जाण्यास ग्रामस्थांनी परवानगी दिल्याची माहिती सिद्धेश्वर शिंदे आणि नितीन कुटे यांनी दिली.