लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे ५ हजार कामांना प्रशाकीय मंजुरी दिली असली तरी त्यातील ७७० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीची ६१७ कामे अजूनही सुरु झाली नसल्याने या योजनेचे काम धिम्या गतीने सुरु असून जलसंधारणाचा हेतू साध्य होण्यात अधिकाºयांची अनास्था अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील दुष्काळ कायमस्वरुपी हाटावा, या उद्देशाने राज्य शासनाने चार वर्षापूर्वी जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे या विभागांना एकत्रित करुन जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली. यासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग घेण्यात आला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु, दुसºया टप्प्यापासून ही कामे धिम्म्या गतीने होत असल्याचे दिसत आहे. विशेषत: उन्हाळ्यामध्ये कामे पूर्ण करुन झालेल्या कामांमध्ये पावसाळ्यात शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होईल, या उद्देशाने योजना राबविली जाते आणि उन्हाळ्यात कामांना गती येते.मागील काही वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रखडलेल्या कामांची संख्या वाढली आहे. २०१६-१७ या वर्षातील कामे २०१८ उजाडला तर पूर्ण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ५ हजार ४० कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी ४ हजार ९५२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.४ हजार ७८७ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यात २८ फेब्रुवारी २०१८ अखेर केवळ ३ हजार ६३४ कामे पूर्ण झाली. तर ५६८ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येते. ६१७ कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे आराखड्यानुसार निश्चित केलेल्या ५ हजार ४० कामांपैकी ४ हजार ९५२ कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिल्याने ८८ कामांना प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याचे दिसत आहे. तर २०१७-१८ या चालू वर्षामध्ये ३ हजार ७७ कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यातील ९२५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांपैकी केवळ ३३४ कामांना कार्यारंभ आदेश दिले असून १६९ कामे पूर्ण झाली आहेत. तर १५३ कामे अजूनही सुरु झाली नाहीत. यावर्षीची १२ कामे प्रगतीपथावर आहेत.दोन्ही वर्षांचा आढावा घेतला असता यावर्षी योजनेच्या कामांनी गती घेतल्याचे दिसत आहे. मात्र मागील वर्षीची कामे धिम्म्या गतीने सुरु आहेत. यावर्षीची कामे सुरु करण्यासाठी प्रशासनाकडे पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे करता येणार नसल्याने उन्हाळयातच यावर्षीच्या कामांबरोबरच मागील वर्षीची कामेही पूर्ण करुन घेण्यासाठी प्रशासनाला गतीने कामे करावी लागणार आहेत. जलयुक्त शिवार या योजनेवर भर देत कामे पूर्ण केली तर आगामी पावसाळ्यामध्ये शाश्वत पाणी स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टिकोणातून पाहणे गरजेचे आहे.
परभणी जिल्ह्यात ७७० कामांना लागेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:26 AM