परभणी : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाचा कारभार नियोजनशून्य असून, यापुढे असे चालणार नाही. मनपाने शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे त्याचप्रमाणे मनपासह जिल्हा रुग्णालय, जि.प. आरोग्य विभागाने आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बी.रघुनाथ सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देवीदास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या हायरिस्क आणि लोरिस्क नागरिकांचा शोध घेतला जात नसल्याबद्दल मुगळीकर यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय ट्रॅव्हल हिस्ट्रीही तपासली जात नाही. तेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरटीपीसीआरच्या चाचण्यांची संख्या वाढवा, जिल्हा रुग्णालयतील ओपीडीत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करा, गर्दीच्या ठिकाणी चाचण्या वाढवा, चाचणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
शहरात १५ पथके स्थापन करा
मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी शहरात पंधरा पथके स्थापन करावीत. या पथकांवर समन्वयक म्हणून उपायुक्तांवर जबाबदारी द्यावी. कोरोनाचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना तपासण्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
नियम न पाळणाऱ्यांवर आता कारवाई
जिल्ह्यात दुकाने, बाजार परिसर, खासगी शिकवणी, मंगल कार्यालय, फंक्शन हॉल आदी ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक गर्दी होत आहे. त्या ठिकाणी मास्क, हॅण्ड सॅनिटायझर, सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अस्थापना आणि संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर देण्यात आली. त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणाऱ्या मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेसची तपासणी करून नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुगळीकर यांनी दिले आहेत.