थकबाकीमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई
परभणी : महावितरण कंपनीच्या वतीने थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, ही योजना विजेअभावी ठप्प राहत आहे. जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असताना केवळ वीजपुरवठा नसल्याने ग्रामीण भागाला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
परभणी : शहरातील देशमुख हॉटेल ते मोठा मारुती दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त असून, मणक्याचे आजार जडत आहेत. मनपाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात सुशोभिकरण
परभणी : शहरातील स्टेडियम भागातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा परिसरात सुशोभिकरण केले जात आहे. या भागात लॉन लावण्यात आली असून, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची माहिती देणारे बोर्ड बसविण्यात आले आहेत. विद्युत रोषणाईमुळे सायंकाळच्या सुमारास हा परिसर उजळून जात आहे.
बाजारपेठ भागात वाहतुकीची कोंडी
परभणी : शहरातील बाजारपेठ भागामध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. अरुंद रस्ते असतानाही दोन्ही बाजूने वाहतूक केली जात असून, दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील सिग्नल यंत्रणा धूळखात
परभणी : वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी उभारलेली लाखो रुपयांची सिग्नल यंत्रणा सध्या धूळखात पडून आहे. शहरातील वाहनांची संख्या दुपटीने वाढली असून, वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सिग्नल सुरु करणे आवश्यक असताना त्याकडे मात्र मनपा व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक जटिल बनत आहे.
जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा सुरूच
परभणी : जिल्ह्यातील बहुतांश वाळू घाटांचे लिलाव झाले नसून, नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, वाळू माफियांचे मात्र फावत आहे. गंगाखेड, पूर्णा आणि पाथरी तालुक्यातील नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा केला जात आहे. प्रशासनाने या विरुद्ध कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.