परभणी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नगरपालिकेत ठराव घेऊन, त्याचे समर्थन केल्याप्रकरणी सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालमचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांना भाजपातून निष्कासित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिका भारतीय जनता पार्टीचा ताब्यात आहे. या नगरपालिकेची 28 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी याप्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये तथ्य आढळल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांना पक्षातून निष्कासित केले आहे.
याशिवाय पालम नगर पंचायतीमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता असून भाजपकडे उपनगराध्यक्ष पद आहे. या नगर पंचायतीमध्ये 2 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेतही सीएए विरोधात ठराव घेण्यात आला. याचा ठपका भाजपाचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनाही पक्षाने, सीएए विरोधात ठराव घेऊन त्याचे समर्थन केल्याप्रकरणी निष्कासित केले आहे. या संदर्भातील आदेश 3 मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले आहेत.